आ. किशोर पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक व सुटका ( पहा व्हिडीओ)
पाचोरा ( प्रतिनिधी );- पाचोरा व भडगाव तालुक्यातील महावितरणच्या २५ कार्यालयात एकाच वेळी आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता कुलुप ठोकण्यात आले. या कार्यालयांना टाळे लावल्यानंतर आ. किशोर पाटील यांचेसह २५ ते ३० कार्यकर्त्यांना अटक करुन ६८ कलमानुसार गुन्हे दाखल करुन ६९ कलमानुसार सोडण्यात आले.
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराच्या निषेध करण्यासाठी आज तालुक्यात आ. किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयांना ‘ताला ठोको’ आंदोलन करण्यात आले. तर, पोलिसांनी आमदारांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून दिले.
आमदार किशोर पाटील यांनी आधीच महावितरणच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी शेतकर्यांच्या कृषी पंपाना विज मीटर बसविलेले नसतांना अव्वा च्या सव्वा विज बिल वसुली करत आहेत. विज वितरण कंपनीने मागील बिलांच्या २५ टक्के वसुली करण्यासाठी सन – २०२२ ची मुदत दिलेली असतांना अधिकार्यांच्या आदेशावरून कर्मचारी शेतकर्यांकडून बळजबरीने विज बिल वसुली करत आहेत. एका रोहित्र वरील काही शेतकर्यांनी पैसे भरलेले असतांना कंपनीचे कर्मचारी त्या रोहित्रावरील संपुर्ण शेतकर्यांचे विज कनेक्शन बंद करत आहेत. रोहित्र जळाले किंवा त्यात बिघाड झाल्यानंतर केवळ ८ तासात बसविण्याचे परिपत्रक असतांना अधिकारी व कर्मचारी त्या पोटी मोठी वसुली करुन एक ते दिड महिन्यात नविन रोहित्र बसविणे अथवा नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करतात असा आरोप आज आमदारांनी आंदोलनाप्रसंगी केला.
आ.पाटील पुढे म्हणाले की, पाचोरा मतदार संघातील केवळ १० ते १५ टक्के शेतकर्यांच्या विहीरींना पाणी असल्याने ते शेतकरी मे महिन्यात कापसाची लागवड करतात. मात्र विज वितरण कंपनीच्या आड मुठेपणामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा व भडगाव तालुक्यातील २५ कार्यालयात एकाच वेळी सकाळी ११ वाजता कुलुप ठोकण्यात आले.
कार्यालयांना टाळे लावल्यानंतर आ. किशोर पाटील यांचेसह २५ ते ३० कार्यकर्त्यांना अटक करुन पोलिस व्हॅनमध्ये नेण्यात आले. ६८ कलमानुसार गुन्हे दाखल करुन ६९ कलमानुसार सोडण्यात आले. टाळे ठोको आंदोलना प्रसंगी ५ अधिकार्यांसह पाचोरा, पहुर, जामनेर येथील १०० पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
आमदार किशोर पाटील यांनी १ जुन रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करुन शेतकर्यांचे विज वितरण कंपनी करत असलेला छळ न थांबविल्यास ५ जुन नंतर पाचोरा मतदार संघातील सर्व विज वितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र ६ जुनला रविवार ची सुट्टी असल्याने अखेर सोमवारी आमदार किशोर पाटील यांनी स्वतः उपस्थित राहुन पाचोरा येथील गिरड रोड वरील कार्यकारी अभियंता श्याम दासकर यांच्या कार्यालयाला कुलुप ठोकले. याच वेळी पाचोरा शहरातील भाग –१ चे उप कार्यकारी अभियंता आसित राठोड, भाग – २ रविंद्र शिरसाठ, भडगाव येथील अजय धामोरे, नगरदेवळा येथील पुरुषोत्तम बोरनारे यांचे सह दोन्ही तालुक्यातील ५ मुख्य कार्यालय व १९ उप केंद्रास सकाळी ११ वाजता कुलुप लावण्यात आले.
पाचोरा शहरातील गिरड रोड वरील मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टाळे ठोको आंदोलना वेळी नगराध्यक्ष संजय गोहील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, बाजार समितीचे प्रशासक चंद्रकांत धनवडे, नगरसेवक राम केसवानी, शितल सोमवंशी, दत्ता जडे, बापु हटकर, आनंद पगारे, गणेश पाटील, प्रविण ब्राम्हणे, सुनिल महाजन, जितेंद्र पेंढारकर, सुमित सावंत, गजु पाटील सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अभियंता श्याम दासकर यांच्या कार्यालयास कुलुप ठोकण्याच्या १५ मिनिटे अगोदर मुख्य कार्यालयातील सर्व कर्मचार्यांना बाहेर काढुन कंपनीच्या कर्मचार्यांनी त्यांचे कुलुप लावुन घेतले होते. त्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी ११ वाजता कुलुप लावले. यावेळी पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौबे, विकास पाटील, जळगांव येथील एस. आय. डी. च्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी पाटील, विजय जाधव, नितीन सुर्यवंशी, यशवंत घोडसे, राहुल बेहरे, राहुल सोनवणे, अजय मालचे, किरण पाटील सह होमगार्ड बंदोबस्तासाठी उपस्थित होते.