चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वाघळी येथे दि. २८ जुलै रोजी पाचोबा महाराजांची यात्रा होती. या यात्रेत १२ महिलांच्या मणी मंगळसूत्रांच्या पोत चोरीस गेल्या. याबाबत दोन संशयित महिलांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाघळी जत्रेत दर्शनासाठी तालुक्यातून भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात. दर्शनानंतर काही भाविक यात्रेत फिरून विविध वस्तू खरेदी करत असतात. या गर्दीचा फायदा घेऊन काही महिला यात्रेच्या निमित्ताने खरेदीच्या बहाण्याने फिरत असतात. सोमवार दि. २८ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी दोन महिला आल्या व त्यांनी ढकलाढकली करण्यास सुरुवात केली. यात सुचिता सागर सपकाळ (रा. पातोंडा) या मुलीला गर्दीतून बाहेर काढत असताना कोणीतरी त्यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्राची पोत तोडल्याचे त्यांना जाणवले. हा प्रकार सपकाळ यांच्या पाठीमागे उभे असलेल्या दोघा महिलांनी केल्याचे त्यांनी सांगितले असता या महिलांना रंगेहात पकडत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांच्या स्वाधीन केले.
सुचिता सपकाळ यांचे १६ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे मणी व वाटी असलेले मनी मंगळसूत्राची पोत ओढून हिसकावल्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित महिला मनीषा उर्फ पिंकी उर्फ आरोही प्रकाश चव्हाण (वय ४५) तसेच प्रमिला उर्फ योगिता प्रकाश चव्हाण काळे (वय २०, रा वेरूळ, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार प्रवीण सपकाळे करीत आहे.