मुंबई (वृत्तसंस्था) – पाच लाख रुपयांची खंडणी शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांच्याकडे मागणाऱ्या तोतयाला बीडमधून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव निशांत उर्फ सनी परमार असे आहे.
गुजरातमधील सांजान पोलिस ठाण्याचा अधिकारी बोलत असल्याचे सांगत निशांतने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगून एका आरोपीला शस्त्र घेण्यासाठी सुनील प्रभूंनी मदत केल्याचे सांगत खंडणी मागण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुरार पोलिसांनी सुनिल प्रभू यांच्या तक्रारीनंतर चौकशी केली असता हा तोतया असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार 36 वर्षीय आरोपीला शोधून अटक करण्यात आली आहे.
आमदार सुनिल प्रभू यांनी खंडणीसाठी फोन आल्यानंतर कुरार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. सुनिल प्रभू यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरु केला. बीडमधून राहत्या घरातून निशांत उर्फ सनी परमार याला अटक केली. पोलिसांनी निशांत उर्फ सनी परमार याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. परमार याच्यावर आधीच 35 गुन्याची नोंद आहे. परमारने याने पोलिस अधिकारी बनून नेता आणि उद्योगपतींकडून वसूली करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे.
कुरार पोलीस ठाण्यात 28 ऑक्टोबर रोजी एक फोन आला होता. त्यामधील व्यक्ती गुजरात सीमेवरील संजान पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सागितले. आपण पोलीस अधिकारी असून आपले नाव रमेशसिंग चौहान असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. एका आरोपीला आम्ही पिस्तूलसह अटक केली आहे, आमदार सुनील प्रभू यांनी हे शस्त्र घेण्यासाठी मदत केल्याचे त्याने सांगितले. तसेच एक हत्या त्याने केली असून तीदेखील प्रभू यांच्या सांगण्यावरून केली आहे. ही माहिती देतानाच त्याने प्रभू यांचा मोबाइल क्रमांक आणि पत्ता विचारला. कुरार पोलिसांनी त्यांना मोबाइल क्रमांक आणि घरचा पत्ता मिळवून देतो असे सांगितले. काही वेळाने पुन्हा या अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्याने प्रभू यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी सहकार्य न केल्यास कारवाई करावी लागेल, असे तो सांगू लागला. प्रभू यांनीदेखील कुरार पोलिसांना फोन करून हा सर्व प्रकार सांगितला. प्रभू यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केल्यास तो तोतया असल्याचे समोर आले.