अमळनेर तालुक्यातील चोपडाई येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- किरकोळ कारणावरून बसचालकाला खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकाकडून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता अमळनेर तालुक्यातील चोपडाई गावाजवळ घडला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भटू निळकंठ पाटील (वय-४६, रा. प्रतापमिल, अमळनेर) हे राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक म्हणून नोकरीला आहे. शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता ते बस क्रमांक (एमएच ०९ एम ९६५३) ने अमळनेर येथून फागणे येथे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी चोपडाई गावाजवळ पुढे जात असलेल्या ट्रॅव्हल क्रमांक (एमएच ०९ सीव्ही २७०९) ला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना समोरून ट्रक आल्याने बसचालक भटू पाटील यांनी अचानक ब्रेक दाबला.
दरम्यान पुढे जाऊन बसचालक भटू पाटील यांनी ट्रॅव्हल्स चालक याला ओव्हरटेक करताना जागा का दिली नाही, असा जाब विचारला. याचा राग आल्याने ट्रॅव्हल्सवरील चालक दैवत वाल्मीक पाटील यांनी बसचालक भटू पाटील यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. याप्रकरणी भटू पाटील फिर्यादीवरून ट्रॅव्हलचा चालक दैवत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहे.