जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रात अभिमानाचे पान
जळगाव (प्रतिनिधी) :- खान्देशात पहिल्यांदाच जळगाव येथील ऑर्किड हॉस्पिटलमध्ये माधवराव आनंदराव पवार (रा.जळगाव) या ६६ वर्षे वयाच्या रुग्णावर ‘तावी’ही हृदयरोग शस्त्रक्रिया १२ डिसेंबर रोजी यशस्वीरीत्या पार पडली.
कार्डिओलॉजिस्ट डॉ. परेश दोशी व टीमने ही अत्याधुनिक प्रकारची व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी केली. यामध्ये छातीची चिरफाड न करता पायाच्या नसमधून कॅथेटरद्वारे हृदयात व्हॉल्व्ह टाकला जातो. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडण्यासाठी डॉ. परेश दोशी यांना डॉ. मेघा शाह (मुंबई), डॉ. अनुजा गद्रे, डॉ. राहुल कैचे, डॉ. प्रशांत बोरोले, डॉ. ऋतुराज, डॉ. मयूर शिंदे यांचे सहकार्य लाभले. जळगावमधील उद्योजक महेश माधवराव पवार यांचे ते वडील आहेत.
ऑर्टिक स्टेनॉसिस असे त्या आजाराचे नाव आहे. जो हृदयविकाराशी संबंधित आहे. हा अत्यंत गंभीर व जीवघेणा आजार आहे. यामध्ये बरेच रुग्ण दगावतात. हा विकार दुर्मिळ यासाठी, कारण जगातील १ हजार व्यक्तींपैकी एका व्यक्तीला या हृदयविकाराने पछाडले जाते. ‘तावी’ म्हणजे ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन. ही एक वैद्यकशास्त्रातील चिकित्सा असून हृदयातील धमनीची झडप (ऑर्टिक व्हॉल्व्ह) जी पूर्णपणे उघडत नाही. त्याला बदलून रक्तप्रवाह सुरळीत करण्याचे आणि सुधारण्याचे कार्य करते.