भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरीत ठेकेदारी पध्दतीने कामास असलेल्या तरुणाच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करीत असताना वाटेतच त्याला हृदयविकाराचा झटका आला व तो खाली पडताच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता घडली.
तिलेश पाटील (वय २६, रा.हनुमान नगर, भुसावळ) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. तिलेश हा तरुण ऑर्डनन्स फॅक्टरीतील जीएम कार्यालयात ठेकेदारी पद्धत्तीने ऑफिस बॉय म्हणून कामाला होता. शनिवारी तो कामावर असतांना त्याला सकाळी १० वाजता अचानक अस्वस्थ वाटू लागले व त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात नेत असताना पीओएच कारखान्याच्या गेटजवळच त्याला जोरात झटका आला.
आयुध निर्माणीतील कर्मचार्यांनी त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्याची तपासणी केली असता, डॉक्टरांनी मृत घोषीत केले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. एकूलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटूंबियांनी आक्रोश केला होता. दरम्यान, तरुण कर्मचाऱ्याच्या अचानक मृत्यूमुळे ऑर्डनन्स फॅक्टरी येथे शोककळा पसरली आहे.