खा. ॲड. उज्ज्वल निकम यांच्या स्वागतावेळी केली होती पाकीटमारी
जळगाव ( प्रतिनिधी ) – मध्य रेल्वेच्या जळगाव स्थानकावर आरपीएफच्या पथकाने ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत दोन सराईत पाकिटमारांना शिताफीने पकडले. खा.ॲड. उज्वल निकम यांच्या स्वागताच्या गर्दी वेळी या चोरट्याने एका व्यक्तीच्या खिशातून रोकड चोरी केली होती.
रविवार २७ जुलै रोजी सकाळी ७:३० वाजता, राज्यसभा सदस्य अॅड. उज्ज्वल निकम यांच्या आगमनाच्या गर्दीत, चेतन गुणवंतराव पाटील यांच्या खिशातून २७ हजार रुपये चोरीस गेल्याची घटना घडली. यासंदर्भात जीआरपी अधिनियम अंतर्गत रेल्वे प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्या गुन्हेगार बडा रशीद बाबुरिया, मालेगाव याच्याविरूद्ध आरपीएफ पोलिस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच २९ जुलै रोजी, वरिष्ठ डीएससी आणि एएससी यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगावच्या आयपीएफ देखरेखीखाली सीपीडीएसच्या पथकातील मनोज मौर्य, पंकज वाघ, एन.एम. मगजन, एएसआय शिवपूजन सिंग आणि अमोल पाटील यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर गेंदालाल मिल, जळगाव येथील सलीम पटवे (वय ४० वर्षे) यास अटक केली.
चौकशीदरम्यान, परस्परविरोधी जबाबानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्धचे मागील गुन्हेगारी रेकॉर्ड देखील उघड झाले असून यात २०१५ – फैजपूर पोलिस स्टेशन, २०१३ जळगाव शहर पोलिस, २०१६ पेठ शहर पोलिस ठाणे, २०१७ जीआरपी भुसावळ आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. संशयित आरोपीला पुढील कारवाईसाठी जीआरपी जळगावकडे सोपवण्यात आले आहे.