जळगाव ;- महाराष्ट्राला प्रबोधनात्मक चळवळीची मोठी परंपरा असून परिर्वतना शिवाय स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत नाही. त्यामुळे समाजात वेळावेळी उदभवणाऱ्या प्रश्नांची वैज्ञानिक चिकित्सा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळूंके यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि झेड. बी. पाटील महाविद्यलयाचा रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि.२९ मे रोजी झालेल्या कर्मवीर व्यंकटराव रणधीर ऑनलाईन व्याख्यानमालेत “समाज प्रबोधन” या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्यवस्थापन परिषद सदस्य दिपक पाटील होते. यावेळी अतिथी म्हणून किसान विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, झेड. बी. पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा.सुधीर पाटील, रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे सहभागी होते.
डॉ.साळूंके म्हणाले की, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, जहाल मतवादी विचार आणि अपृश्यता निवारण चळवळ असे प्रबोधनाचे चार टप्पे महाराष्ट्रात बघायला मिळतात. या कालखंडातील महापुरुषांचे मुल्यमापन त्याकाळातील संदर्भ घेऊनच करावे लागेल अन्यथा त्यांच्यावर तो अन्याय ठरेल. असे सांगतांना त्यांनी महात्मा फुले, शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रानडे, टिळक, आगरकर या सोबतच सर्व संत, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनेक संदर्भ दिले. आपल्याकडे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थाला सारखेच महत्व दिले गेले असले तरी काळाच्या ओघात फक्त आणि फक्त अर्थकारणाला महत्व दिले गेले. वैचारिक प्रबोधना शिवाय पर्याय नाही. वैज्ञानिक चिकित्सा केल्या शिवाय सत्यशोधन होणार नाही. सद्यस्थितीत प्रबोधनासाठी समाजिक परिषदांचे आयोजन, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार, समाज उत्थानासाठी राखीव जागा हे पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ च्या या परिस्थितीत समाज प्रबोधन अधिक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ.तुषार रंधे यांनी कर्मवीर व्यकंटराव रणधिर यांच्या विचारांचा वारसा चालविण्याची गरज यावेळी बोलून दाखविली. अध्यक्षीय भाषणात दिपक पाटील यांनी सद्याच्या काळात शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे आणि प्रबोधन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. प्रा.सुधीर पाटील यांनी झेड.बी.पाटील महाविद्यालयाच्या विकासाची माहिती दिली. डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी कोविडच्या काळात राष्ट्रीय सेवा योजनेने केलेल्या कामाची माहिती दिली. प्रास्ताविक प्राचार्य पी.एच.पवार यांनी केले. प्रा.संगीता जगदाळे यांनी स्वागत गीत म्हटले. सुत्रसंचालन रासेयो मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रशांत कसबे यांनी केले. रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योगीता पाटील यांनी आभार मानले. कर्मवीर व्यंकटराव रणधीर प्रतिष्ठान, शिरपूर यांनी दिलेल्या देणगीतून ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते.