यावल तालुक्यातील चितोडा येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : ऑनलाइन ॲपवर घर (फ्लॅट) शोधणे तालुक्यातील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या अज्ञात भामट्याने चितोडा गावातील २९ वर्षीय महिलेला तब्बल २ लाख ३८ हजार ३१९ रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. या गंभीर फसवणुकीप्रकरणी सोमवारी १५ डिसेंबर रोजी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चितोडा गावात राहणाऱ्या कल्याणी नितीन महाजन (वय २९) या महिलेने ६ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ७ डिसेंबरच्या दरम्यान ‘नो ब्रोकर’ नावाच्या ऑनलाइन ॲपवर फ्लॅट शोधण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान, ‘रमाकांत कुमार’ असे नाव सांगणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. या भामट्याने कल्याणी महाजन यांचा विश्वास संपादन केला. फ्लॅटचे बुकिंग आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला वेळोवेळी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. फ्लॅटचे टोकन अमाउंट, डिपॉझिट तसेच ‘परत मिळणारी रक्कम’ असल्याचे सांगत, आरोपीने श्रीमती महाजन यांच्या बँक खात्यातून एकूण २ लाख ३८ हजार ३१९ रुपये स्वतःच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले.
पैसे ट्रान्सफर केल्यानंतरही फ्लॅटचे बुकिंग न झाल्याने आणि संबंधित व्यक्तीशी संपर्क तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे कल्याणी महाजन यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, यावल पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दिन शेख हे करीत आहेत.









