सायबर पोलीस स्टेशनचे यश, कोलकाता येथून घेतले ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) :-टास्क पूर्ण करून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाला ऑनलाईन फसविणाऱ्या संशयित आरोपीला सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कोलकाता येथून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
चेतन कन्हैया फिरके (३१, रा. जामनेर) यांची आठ लाख ७५ हजार १७५ रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात ९ सप्टेंबर २०२३ ला गुन्हा दाखल करण्यात आला. चेतन फिरके यांच्या व्हॉटस् अप व टेलिग्राम आयडीवर ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२३ या दरम्यान एका जणाने संपर्क साधत त्यांना टास्क देऊन तो पूर्ण करून त्यात गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा देण्याचे सांगितले. त्यासाठी या अनोळखीने फिरके यांच्याकडून वेळोवेळी एकूण आठ लाख ८२ हजार रुपये स्वीकारले. त्यापैकी टास्क पूर्ण केल्याबद्दल भरलेल्या एकूण रकमेपैकी केवळ सहा हजार ८२५ रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. उर्वरित नफा व मुद्दल रक्कम मात्र परत केली नाही.
फिरके यांना सांगितल्याप्रमाणे नफा व त्यांची रक्कम दिली नाही. मात्र त्यांना एक बनावट पत्र दिले असून त्यावर विदेशातील एका स्टॉक एक्सचेंजचे नाव आहे. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. पोलीस त्याचा तपास करीत होती. त्यानुसार तपासात गौरव गौतम बर्मन (वय २४, रा. राजरहाट, गोपालपूरा, कोलकाता) याने हा गुन्हा केल्याचे दिसून आले.
त्याला कोलकाता येथून अटक करून जळगावात आणण्यात आले होते. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत बेलदार, पोहेकॉ हेमंत महाडिक, पोहेकॉ मिलिंद जाधव यांनी परिश्रम घेतले.