जळगाव ( प्रतिनिधी ) – दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्याने विकसित झालेल्या ओमिक्रोन विषाणूशी लढण्यासाठी राज्यात प्रशासन तयारीला लागले आहे . उपायांचा भाग म्हणून आता कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यानाच प्रवासाची मुभा दिली जाणार आहे . जिल्ह्यात अजूनही साडे अकरा लाख लोक लसीकरणापासून दूरच आहेत अशी माहिती आज प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पोटोडे यांनी दिली .
प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पोटोडे पुढे म्हणाले की , ओमिक्रोन विषाणू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेल्या डेल्टा विषाणूपेक्षा पाच पट जास्त घातक आहे त्याचा प्रसाराचा वेग आणि लक्षणांची तीव्रताही जास्त असल्याने गाफील राहून चालणार नाही . प्रतिबंध हा एकमेव उपाय आपल्या हातात आहे . कोरोना लसीचे २ डोस घेतलेल्यांना त्रास झाला तरी आधी दुसऱ्या लाटेत पण लक्षणांची तीव्रता कमी होती . अजून जिल्ह्यात साडे अकरा लाख लोक लसीकरणापासून लांब आहेत १ डोस घेतलेल्याचे प्रमाण ६८ टक्के आहे . लोक दुसरा डोस घेण्यासाठी आलेलेच नाहीत . मास्क , सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझर हेच उपाय आहेत . मुंबईत ओमिक्रोनचे २ रुग्ण आढळले आहेत . ओमिक्रोनची उत्पत्ती दक्षिण आफ्रिकेत रोगप्रतिकारक शक्ती संपवणाऱ्या आजारांना बळी पडलेल्या लोकांच्या शरीरातून म्यूट होऊन झाली आहे जळगाव जिल्ह्यात २३ लाख लोकांना पहिला डोस दिला गेलेला आहे . १ लाख ३९ हजार लोक असे आहेत कि जे दुसऱ्या डोससाठी टाळाटाळ करीत आहेत . दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रोनचा त्रास होऊ शकतो मात्र नक्कीच लक्षणांची तीव्रता कमी असेल . लसीकरणामुळे कोरोना संक्रमणाची सुद्धा तीव्रता कमी होऊ शकेल . सध्या जिल्ह्यात ड्रोज फक्त ३० ते ४० हजार लोकांना लस दिली जाते आहे , असेही ते म्हणाले .