मुंबई ( वृत्तसंस्था ) – राज्यात वाढणारी ओमायक्रॉन कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकार सतर्क झाले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी
वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यात कठोर नियमावली लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे .
यामध्ये रहदारीची ठिकाणे, पार्टी, लग्न समारंभ तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या इतर सामाजिक कार्यक्रमांच्या ठिकाणी निर्बंध पाळावेच लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना रुग्णवाढीची गती पाहता हा सतर्कतेचा इशाराच समजायला हवा. त्या अनुषंगाने काळजी घेण्याची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले.
कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात येणारे कोरोना प्रतिबंधात्मक लशींचे डोस हे वापरलेच जावेत अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधात्मक लसी पूर्ण वापरल्या न जाणे हे राष्ट्रीय नुकसान आहे. असे राज्य सरकार कधीही होऊ देणार नाही, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला.
लसीकरणापासून वंचित असलेल्या लोकांची यादी काढण्यात आली आहे. गावोगावी, घराघरात जाऊन आशा वर्कर्सच्या माध्यमातून लसीकरण पूर्ण करण्याचे काम होत आहे. तरीही या सर्व प्रक्रियेला गती द्यायला हवी. यासाठी सर्व लोकप्रतिनीधी, सामाजिक नेते, सेवाभावी संस्था, माध्यमं अशा सर्वांनी एकत्र येऊन जनजागृतीद्वारे लसीकरण मोहीम यशस्वी करूया, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.