अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला लोक न्यायालयामुळे १४ लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई
केवळ सहा महिन्यांत मिळाला न्याय!
जळगाव प्रतिनिधी न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते, या समजुतीला छेद देत जळगाव येथील लोक न्यायालयाने एका अपघातग्रस्त कुटुंबाला केवळ सहा महिन्यांत समाधानकारक नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा येथील रहिवासी उदा हरी तंवर यांच्या अपघाती निधनानंतर, त्यांच्या वारसांना लोक न्यायालयाच्या माध्यमातून तब्बल १४ लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.
हा दुःखद अपघात १३ एप्रिल २०२५ रोजी जामनेर ते खोदगाव रोडवर घडला होता. भीमराव बळीराम जावरे (चालक आणि मालक) याने त्याच्या ताब्यातील टाटा मॅजिक वाहन (क्र. एम.एच. १९ बी.यु. ६०६३) भरधाव वेगाने चालवून समोरून आलेल्या उदा हरी तंवर यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत उदा हरी तंवर यांचा जागीच मृत्यू झाला. ते कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट आले होते.
घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे कुटुंबाने जळगाव येथील मोटार अपघात दावा प्राधिकरणाकडे ॲड. महेंद्र सोमा चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत तातडीने नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. मयताची पत्नी, त्यांची तीन मुले आणि विवाहित मुलगी यांनी मिळून हा दावा दाखल केला होता. दावा दाखल झाल्यानंतर केवळ दोन न्यायालयीन तारखांमध्येच अर्जदाराच्या वकिलांनी विमा कंपनीकडे (श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी) पाठपुरावा केला. सुरुवातीला विमा कंपनीने १२ लाख रुपयांची ऑफर दिली होती, परंतु वाटाघाटीअंती दोन्ही पक्षांमध्ये १४ लाख ५० हजार रुपयांच्या रकमेवर यशस्वी तडजोड झाली.
सदरचे प्रकरण लोक न्यायालयामध्ये ठेवण्यात आले आणि मयताच्या वारसांना ही भरपाई देण्याचा हुकूमनामा विमा कंपनीविरुद्ध पारित करण्यात आला. केवळ ६ महिन्यांच्या विक्रमी वेळेत न्याय मिळाल्यामुळे पीडित कुटुंबाने समाधान व्यक्त केले. त्यांनी लोक न्यायालयाचे पॅनल क्रमांक १ चे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश एस.एन. राजुरकर आणि पॅनल सदस्य ॲड. शरद सोनवणे यांचे मनापासून आभार मानले.
अर्जदारातर्फे ॲड. महेंद्र सोमा चौधरी, ॲड. श्रेयस महेंद्र चौधरी, ॲड. हेमंत जाधव, ॲड. सुनील चव्हाण यांनी कुटुंबाची बाजू समर्थपणे मांडली. विमा कंपनीतर्फे ॲड. प्रसाद गोडबोले आणि ॲड. मनोज राऊत यांनी पुढाकार घेत हे प्रकरण तत्परतेने निकाली काढले. या निकालामुळे, लोक न्यायालय हे केवळ जुनी प्रकरणे निकाली काढण्यासाठीच नाही, तर गरजू पीडितांना जलद आणि समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठीही अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे सिद्ध झाले आहे.









