जळगाव- येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्मधिकारी व्याख्यानमालेंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता व सुप्रसिद्ध इतिहासकार अनिल नौरिया यांचे “असहयोग आंदोलन – स्वतंत्रता संग्राम की अनोखी मशाल” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यान मालेचे हे चतुर्थ पुष्प आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात असहयोग आंदोलनाचे विशेष महत्त्व आहे. २०२४ हे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहयोग आंदोलनाचे शताब्दी वर्ष असल्याने असहयोग आंदोलन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कै. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या दत्तात्रय धांडे सभागृहात करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे वक्ते मा. अनिल नौरिया गेली ४ दशके नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते नेहरु स्मृती संग्रहालय व ग्रंथालयाचे वरिष्ठ सहकारी म्हणून कार्यरत होते. एक बहुआयामी अभ्यासू व्यक्तित्व असलेल्या नौरिया यांनी दिल्ली, डर्बन, बडोदा, टोकियो, जोहान्सबर्ग, ग्वाल्हेर, हैदराबाद यासह विविध ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. त्यांची अनेक पुस्तके व संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आले आहेत. अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. अंबिका जैन व कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आयोजकांच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.