महिलेला बाथरूमला कोंडले, जळगावात व्यावसायिक राजा मयूर यांच्या घरी घडला प्रकार
दरोड्यांच्या मालिकांमुळे कायदा सुव्यवस्था वेठीस
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरात जबर दरोडा पडला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक राजा मयूर यांना त्यांच्या सुरक्षारक्षकांसह त्यांच्याच नोकराने गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले. तसेच त्यांच्या पत्नीला चाकूच्या धाकावर बाथरूममध्ये कोंडत नोकराने साथीदाराच्या मदतीने मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अद्यापि कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नव्हती.
शहरातील दूध फेडरेशन परिसरात राजा ट्रॅक्टरचे मालक राजेंद्र अनिल मयूर उर्फ राजा मयूर (वय ८४) हे पत्नीसह राहतात. त्यांच्या बंगल्यावर विकास नेपाळी नावाचा माणूस देखील कामाला होता. राजा मयूर यांच्या घराच्या बाजूलाच एका खोलीत तो राहत होता. या बंगल्यात दोन सुरक्षारक्षक देखील रात्रीला पहारा देत असतात. दि. ३० मे रोजी रात्री १०.३० वाजता विकास नेपाळी याने भावाला मुलगा झाला असे सांगून सुरक्षारक्षक वसंत श्रीखंडे व उदय समेळ यांना सरबत पाजले. या सरबतमध्ये त्याने गुंगीचे औषध टाकले होते.
तसेच नोकराने हे सरबत राजा मयूर यांना देखील पाजले. त्यामुळे दोनही सुरक्षारक्षक आणि राजा मयूर हे बेशुद्ध झाले. पहाटे दोन वाजता विकास नेपाळी याने त्याचे साथीदार असलेल्या चार जणांना बोलावून घेतले. घरात राजा मयूर यांची पत्नी शैला मयूर यांना चाकूचा धाक दाखवून बाथरूममध्ये बंद करून त्यांना धमकी दिली. यामुळे त्या घाबरून गप्प बसल्या. दरम्यान, संशयित आरोपी विकास नेपाळी व त्याचे इतर चार अज्ञात साथीदार यांनी मिळून घरातील मुख्य खोली उघडून घरातील सामान अस्ताव्यस्त करून घरातील मौल्यवान वस्तू व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेल्याचे समजून येत आहे.
राजा मयूर हे जैन हिल्स येथे सकाळी ७ वाजता मॉर्निंग वॉकिंगसाठी जातात. त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांचा चालक कांतीलाल टाक यांनी राजा मयूर यांना फोन लावला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे चालकाने याने त्यांचे भाऊ भरत मयूर यांना फोन करून ते फोन उचलत नसल्याचे सांगितले. त्यानुसार भारत मयूर हे राजा मयूर यांच्या घरी आले असता, हा सर्व प्रकार उघडकीला आला. यावेळी बेशुद्ध अवस्थेत पडलेले सुरक्षारक्षक आणि राजा मयूर हे बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना उठवून पाणी पाजले. त्यानंतर भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या शैला मयूर यांना देखील धीर दिला.
दरम्यान, चोरटयांनी या घटनेत राजा मयूर व त्यांच्या पत्नी शैला मयूर यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व पथक घटनांसाठी दाखल झाले. अद्यापि दुपारपर्यंत कुठलाही गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता. दरम्यान, सौरभ ज्वेलर्स दरोड्यानंतर हा मोठा दरोडा पडला आहे. अनेक लहानमोठे दरोडे शहरात सुरूच आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.