नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांसाठी हरियाणा सरकारने 75 टक्के आरक्षण लागू केले आहे. हा नवा कायदा येत्या 15 जानेवारी 2022 पासून लागू होणार असून, याबाबत हरियाणा सरकारकडून माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटले आहे की, राज्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर रोजगारासंबधीत नवा कायदा येत्या 15 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. या कायद्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन, स्थलांतरणाला आळा बसेल.
या वर्षीच्या मार्च महिन्यामध्येच हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी संबंधित विधेयकाला मान्यता दिली होती. त्यामुळे आता 15 जानेवारी 2022 पासून खासगी क्षेत्रातील रोजगारासंबंधी नवा कायदा लागू होणार आहे. नव्या कायद्यानुसार जे लोक हरियानाचे रहिवासी असून खासगी क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांचे मासिक उत्पन्न हे 30 हजारांच्या खाली आहे, अशा लोकांना आता नोकरीमध्ये 75 टक्के आरक्षण दिले जाणार आहे.
खट्टर यांनी म्हटले आहे की, हा नवा कर्मचारी कायदा खासगी क्षेत्रातील सर्व अस्थापना, कंपन्या आणि व्यवसायांना लागू होणार आहे. नियमानुसार कंपन्यांमध्ये 75 टक्के स्थानिक तरुणांची भरती करणे बंधनकारक असणार आहे. ज्या अस्थापनाचे कर्मचारी हे दहापेक्षा कमी आहेत, अशा व्यवसायांना या कायद्यामधून सूट देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्वांची राज्य सरकारकडे नोंद राहाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे.