भुसावळ (प्रतिनिधी) – सुनेवर हृदयाचे उपचार सुरू असतांना निधन झाल्यानंतर बसलेल्या धक्क्याने वयोवृध्द सासूचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकेगाव येथे घडली आहे. यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

याबाबत माहिती अशी राहणार साकेगाव येथील तथा सध्या पुणे येथे वास्तव्यास असणार्या रंजनाबाई सुरेश मनोरे या महिलेचा शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मृत्यू झाला. हृदयावर शस्त्रक्रिया सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्वास घेतला. दरम्यान, हे वृत्त साकेगाव येथे येतच त्यांची सासू मीराबाई गोविंदा मनोरे (वय ७५) यांना तीव्र धक्का बसला. सायंकाळपासूनच त्या शोकाकुल अवस्थेत होत्या. त्या सातत्याने रडत होत्या.
दरम्यान, रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मीराबाईंना हृदयविकाराचा तीव्र अटॅक आला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबात झालेल्या या दोन मृत्यूंमुळे साकेगाववर शोककळा पसरली आहे. दरम्यान, रंजनाबाई यांचे पार्थिव रविवारी सकाळी साकेगाव येथे आणले. यानंतर या सून व सासूच्या पार्थिवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मीराबाई गोविंदा मनोरे यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पुत्र तथा मयत रंजनाबाई यांचे पती सुरेश मनोरे हे पुणे येथील आयुध निर्माणीत कार्यरत आहेत.







