मुंबई ;- महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची गेल्या 24 तासातील आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात एकूण 1 हजार 447 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 2 हजार 333 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना कालची आकडेवारी ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 36 हजार 674 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 92 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 6 लाख 34 हजार 314 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.
रुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील कालची रुग्णसंख्या ही मागच्या 2 ते 3 दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या असल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी सर्वाधिक रूग्णसंख्या ही मुंबईत आढळुन येत होती, पण आता ही रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने मुंबई शहराची कोरोनामुक्तीकडे आगेकुच सुरू असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे