मुंबई – उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी देखील शिक्कामोर्तब केलं आहे. संजय राऊत यांनी सांगितलं की, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या बहुतेक उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ते म्हणाले की त्या शिवसैनिकच आहेत. त्यांचा शिवसेनेत प्रवेश ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळं आमची महिला आघाडी मजबूत होईल, असंही संजय राऊत म्हणाले. उर्मिला मातोंडकर उद्या (1 डिसेंबर) दुपारी बारा वाजता त्या शिवसेनेत सामील होतील. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिली आहे.
सलग पाचव्या दिवशी कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरुच आहे. या आंदोलक शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का ? असा सवाल करत संजय राऊत यांनी बळाचा वापर चीनच्या सीमेवर करा असा सल्लाही केंद्र सरकारला केला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जो शेतकरी तुमचा अन्नदाता आहे त्याला तुम्ही दहशतवादी, देशद्रोही म्हणत आहात. पंजाब, हरियाणामधील शेतकरी महाराष्ट्राप्रमाणे आहे. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्यं आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का?, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.