जळगाव : आशियातील सर्वोत्कृष्ट ३० टक्के विद्यापीठांची क्रमवारी ‘स्टडी अब्रॉड एड’ संस्थेने जाहीर केली असून यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश झाला आहे. या क्रमवारीत विद्यापीठाचा समावेश झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
या संस्थेने आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली आहे. जगातील व्यापक विद्यापीठांचा डेटाबेस या संस्थने प्राप्त केला. त्यामध्ये आठ हजार पेक्षा अधिक संस्थांचा समावेश होता. जगभरातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या कोणत्या शैक्षणिक संस्था आहेत. याची माहिती व्हावी व पैशांचे मूल्य कळावे आणि त्यांनी प्रवेशासाठी या विद्यापीठांचा विचार करावा या हेतूने या संस्थेद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये आशियाखंडातील ३,३४९ उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन करून या संस्थने क्रमवारी जाहीर केली. आशियातील ३० टक्के उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्थान प्राप्त केल्याचे जाहीर केले आहे. क्रमवारीसाठी जे निकष होते त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेसाठी ७५ टक्के आणि शैक्षणिक शुल्क खर्चासाठी २५ टक्के गुण होते.
स्टडी अब्रॉड एड संस्थेने जाहीर केली यादी आंतराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण झाल्याने या क्रमवारीत विद्यापीठाचा समावेश झाला आहे. कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठामार्फत विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविले जातात. जागतिक पातळीवरील स्पर्धेचे भान लक्षात ठेवून अभ्यासकमांची रचना, प्लेसमेंट, विद्यार्थी सुविधा, पायाभूत सोयी आदींवर भर दिला जात असल्यामुळे विद्यापीठाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.