जळगाव (प्रतिनिधी) विद्यापीठात बाहेरगावाहून येणाऱ्या महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांना प्रशासकीय इमारतीपर्यंत येण्यासाठी १५ सायकली विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गेल्या आठवड्यात जळगाव जिल्हा रोटरी परिवाराच्या वतीने विद्यापीठास ७५ सायकली देण्यात आल्या. यापैकी १५ सायकली १८ ऑगस्ट पासून हायवे लगतच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी सायकल स्टॅण्ड उभारण्यात आले आहे. बाहेरगावाहून मुख्य प्रवेशद्वाराजवळ बसने उतरल्यानंतर प्रशासकीय इमारतीकडे येण्यासाठी महाविद्यालयीन कर्मचारी अथवा विद्यार्थ्यांना वाहन उपलब्धते अभावी पायी यावे लागत असे. आता त्यांचा हा त्रास कमी होणार असून प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेल्या सायकलीने ते विद्यार्थी भवनाजवळ येवून तेथील सायकल स्टॅण्डवर सायकल लावून आपल्या कामासाठी जावू शकतात. काम झाल्यावर परत प्रवेशद्वाराजवळ सायकलीने परतता येईल. विद्यार्थी भवन व मुख्य प्रवेशद्वाराजवळ संबंधितांची नोंद केली जाईल.
गुरुवारपासून या सुविधेला प्रारंभ झाला असून यावेळी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, व्य.प. सदस्य प्रा.जे.बी. नाईक, प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी, सुभाष पवार आदी उपस्थित होते.