महावितरणतर्फे “लकी डिजिटल ग्राहक योजने”तून भेटवस्तू
अमळनेर (प्रतिनिधी) : नियमित ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून लकी ड्रॉ काढून बक्षिसे देण्यात येत असून नुकत्याच तीन विजेत्या ग्राहकांना कार्यकारी अभियंत्याच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.
महावितरण विभागाने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली असून पाच महिने या योजनेचा कालावधी आहे. या तीन वेळा लकी ड्रॉ काढण्यात येणार असून उपविभागीय स्तरावर विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. आता उपविभागीय स्तरावर एप्रिल २५ महिन्याची सोडत काढण्यात आली असून तालुक्यातील भिलाली येथील दुर्गाबाई गैधल पाटील यांनी प्रथम क्रमांक, मारवड येथील उमाकांत गिरीधर साळुंखे व किशोर पोलाद पाटील (निंभोरा) यांनी द्वितीय क्रमांक तर सुका रघुनाथ चांभार (अमळगाव) व ईश्वर बाबुराव पाटील (पाडसे) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना स्मार्टफोन तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना स्मार्टवॉच कार्यकारी अभियंता निलेश सोनगीरे (धरणगाव विभाग) यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
महावितरणच्या वेबसाइट किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन वीज बिल भरल्यास अनेक फायदे असून या पद्धतीमुळे, तुम्हाला रांगेत उभे राहण्याची किंवा बँकेत जाण्याची गरज नसते आणि वेळ व श्रम वाचतात. तसेच, काही वेळा ऑनलाइन भरणा केल्यास तुम्हाला सूट किंवा बक्षीस देखील मिळू शकते, त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन भरणा करावा असे उपकार्यकारी अभियंता नितीन चौधरी यांनी यावेळी सांगितले.