भडगाव तालुक्यातील वडगाव फाट्याजवळची घटना
भडगाव ( प्रतिनिधी ) – वरखेडी येथून गांधीधाम (गुजरात) येथे तांदूळ घेऊन निघालेला सोळाचाकी ट्रक गुरुवारी दुपारी नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वडगाव फाट्याजवळ नियंत्रण सुटल्याने रोडच्या बाजूला असलेल्या खोलगट शेतात उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रकमधील तांदूळाच्या गोण्या रस्त्यावर आणि शेतामध्ये विखुरल्या गेल्या. ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक, वाहनचालक व शेतकरी उपस्थित होते. ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोलगट रस्त्यावर उलटला होता. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच भडगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या.
चालक किरकोळ जखमी झाला असून तो बालंबाल बचावला आहे. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्रकमधील तांदूळ गुजरातमध्ये नेला जात होता, अशी माहिती चालकाने नागरिकांना दिली. सायंकाळपर्यंत भडगाव पोलिस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती.