जळगाव (प्रतिनिधी ) ;- पाचोरा व भडगाव तालुक्यातील अनेक शेतकऱयांनी मोसंबी फळांची लागवड केली असून या मोसंबी उत्पादक शेतकर्याना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात म्हटले आहे कि, पाचोरा व भडगाव तालुक्यात एक प्रमुख फळपीक म्हणून मोसंबी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱयांनी केली आहे. हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत मोसंबी या फळपिकांची मृग आंबिया बाहेरचा समावेश केलेला आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने मोसंबी फळ पिकाची लागवड केलेल्या शेतकर्याना मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत कमी पाऊस झाल्याने शेतकर्याना नुकसान भरपाई देय आहे. मात्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱयांच्या नुकसानीबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. तसेच शेतकऱयांच्या नुकसानीची पडताळणी करण्यात आलेली नाही . यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली आहे. निवेदनावर भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटी, किसान मोर्चाचे अध्यक्ष यशवंत पाटील, विश्वास पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.