जळगावात निरीक्षकासह ४ पोलीस जखमी
\जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शुक्रवारी दि. १६ जानेवारी रोजी मतमोजणी एमआयडीसी येथे पार पडली. यावेळी फेरमतमोजणी घ्यावी याकरिता आग्रही असणाऱ्या पिंप्राळ्यातील नागरिकांनी दगडफेक केल्याप्रकरणी आता एमआयडीसी पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमध्ये पोलीस निरीक्षकासह ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. पिंप्राळा येथील प्रभाग क्रमांक १० मध्ये फेरमतमोजणी घ्यावी या मागणीसाठी तेथील उमेदवार आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण विरभान पाटील हे आग्रही होते.(केसीएन)त्यासाठी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज देखील दिला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज फेटाळला व तसा लेखी अर्जही त्यांना दिला होता. मात्र तरी देखील उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे समाधान झाले नाही असे फिर्यादीत म्हटले आहे.
मतमोजणी केंद्राच्या बाहेर पडल्यावर वखार महामंडळाच्या परिसरामध्ये पोलीस प्रशासनाला सहकार्य न केल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच यावेळी झालेल्या गोंधळात पोलीस दलावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये यावल पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे, कॉन्स्टेबल विजय रंधे, मोहित सोनवणे, अविनाश राजपूत हे जखमी झाले.(केसीएन)यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान पिंप्राळा येथील लोकांना बोलावून घोषणा देणे, बॅरिकेट तोडणे आणि दगडफेक करणे या कृत्याखाली शासकीय कामात अडथळा आणि दंगा करणे असे विविध कलम संशयित आरोपींवर लावण्यात आले आहेत.
यामध्ये संशयित आरोपी म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण वीरभान पाटील, त्यांचे बंधू पंकज वीरभान पाटील आणि इतर २०० ते २५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश वाघ हे करीत आहेत. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यामुळे आता पिंप्राळा परिसरासह जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.









