नाथाभाऊंच्या पक्षांतराचा भाजपाला बसणार मोठा फटका

जळगाव (प्रतिनिधी) – येथील महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची गुरुवार दि. २२ रोजी निवडणूक होणार असून या निवडणुकीत बहुमत असूनही केवळ एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतरामुळे भाजपाला मोठा फटका बसून सभापतिपदी शिवसेनेचे नितीन बरडे हे सभापती होतील अशी खात्रीलायक माहिती मिळत असून येथूनच महापालिकेत भाजपचे उलटे वासे फिरण्याची शक्यता आहे.
स्थायी समिती सभापती पदासाठी बुधवारी २१ रोजी सुरुवातीला शिवसेनेचे नितीन बरडे यांनी तर भाजपतर्फे राजेंद्र घुगे पाटील यांनी नामनिर्देशन अर्ज सादर केला. स्थायी समितीमध्ये सेनेचे ३ तर एमआयएमचे १ सदस्य आहे. यासह भाजपचे १२ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, बुधवारी २१ रोजी एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराची बातमी राष्ट्रवादी व खुद्द खडसे साहेबांकडून जाहीर झाल्यानंतर आता भाजपचे उलटे वासे फिरायला सुरुवात झाली आहे. एकूण ३२ भाजपचे नगरसेवक वेगळा गट स्थापन करणार असल्याचे वृत्त असून त्यासोबत गुरुवारी होणाऱ्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत देखील भाजपचा सभापती पदाचा उमेदवार पराभूत होणार अशी चिन्हे दिसून येत आहे. या निवडणुकीत प्रचंड सस्पेन्स असून सुमारे भाजपचे ८ नगरसेवक सेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात असून गुरुवारी सत्तेत असलेल्या भाजपला मोठे हादरे बसणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळालेली आहे. दरम्यान मुक्ताईनगर येथे खडसेंच्या भेटीला सेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक नितीन बरडे , प्रशांत नाईक हे गेले असल्याची माहिती मिळाली आहे.







