जळगाव ( प्रतिनिधी ) – महापालिकेच्या महासभेत काल लज्जास्पद अध्याय घडला शहवासियांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मुद्यावरून गुद्द्यांवर उतरले असतांनाच आता एका नगरसेवकाने यावरून जळगावकरांची माफी मागितली आहे.
काल महासभेत विरोधी आणि सत्ताधारी एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. याचा सर्वत्र निषेध होत असतांना आता शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी सोशल मीडियातून जाहीर माफी मागितली आहे.
महानगर पालिकेच्या महासभेत काल गोंधळ घातला गेला. हा गोंधळ विकासकामे मंजुरीसाठी नव्हता. वैयक्तिक हेवेदावे यासाठी होता. कोण काय बोलले आणि कोणी काय केले ? याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात आले आहेत. मीसुद्धा मनपा सभागृहाचा सदस्य असून काल झालेल्या प्रकाराबद्दल जळगावकरांची मी जाहीर माफी मागतो. आम्ही विकास कामांसाठी एकत्र येत नाही तर दुसऱ्याच्या पदाला हरकती घेऊन भांडतो. ही नवी संस्कृती सभागृहात निर्माण होते आहे. याचा मला खेद असून शहरासाठी काहीही न करू शकत असल्याबद्दल खंत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेला आता १२० कोटी रूपयांवर विकास निधी मिळालेला आहे. या निधीतून शहर विकासाचे अनेक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. या प्रस्तावांना मंजुरी देताना सत्ताधारी किंवा विरोधक असा भेदभाव नको. प्रत्येक काम हे नागरिकांसाठी आहे. ते वेळीच मंजूर व्हायला हवे. निधी वेळेवर खर्च व्हायला हवा. पण आताचे विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत. विकास कामे होऊ नये ही त्यांची इच्छा आहे. महानगरपालिकेत मागील अडिच वर्षे विरोधक सत्तेत होते. त्यांना पूर्वीच्या युती सरकारने दिलेला व आताच्या मविआ सरकारने दिलेला निधी खर्च करून विकास कामे करता आली नाही.
आता पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील हे महानगर पालिकेला वाढीव निधी मिळवून देत असून तो वेळेवर खर्च झाला पाहिजे. अन्यथा मार्च २०२२ मध्ये निधी परत जाईल. विरोधक स्वतःचा स्वार्थ साधायला फुटकळ विषयांवर विरोध करीत आहे. अशावेळी काहीही काम होत नसेल तर जळगावकरांची माफी मागणे हाच पर्याय उरतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मी विरोधकांना विनंती करतो की, महानगर पालिका सभेत विकास कामांचे ठराव मंजूर करा. तुमचा विधायक विरोध नोंदवा. गरज वाटली तर मनपा आयुक्त, नाशिकचे विभाग आयुक्त, नगरविकास मंत्री, उच्च न्यायालयात तक्रारी करा. कायद्याची भांडणे तेथे करा. पण सभागृहात इतर सदस्यांना धक्काबुक्की करू नका. शहरातील चार लाखावर मतदारांनी विश्वासाने निवडून दिले याचे भान राखा. सभागृहाची व स्वतःची प्रतिष्ठा जपा असे आवाहनही त्यांनी केले .