गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची प्रतिक्रिया
जळगाव (प्रतिनिधी) – डॉ. संजय महाजन यांनी अध्यापनाच्या माध्यमातून भविष्यातील पिढी घडवण्याचे महत्त्वाचे कार्य केले. समाजाला एका अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेला मुकावे लागले आहे, अशा शब्दात गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
शहरात गेल्या साडेतीन दशकांपासून आपल्या वैद्यकीय सेवेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ फिजिशियन डॉ. संजय महाजन यांचे आज पहाटे ४ वाजता मुंबईत उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने जळगावमधील वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. संजय महाजन यांनी गेल्या ३५ वर्षांपासून जळगाव शहरात अविरतपणे वैद्यकीय सेवा दिली.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय देखील त्यांनी १५ वर्षे अध्यापन केले. तसेच रुग्णालयात रुग्णसेवा केली. एक निष्णात फिजिशियन म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. केवळ उपचार करणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता, रुग्णांना धीर देणारा एक आपुलकीचा डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. १५ वर्षांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव पाहता, त्यांनी अनेक सक्षम डॉक्टर्स घडवले यात शंका नाही.
१५ वर्षे सतत अध्यापन करणे हे त्यांच्या विषयावरील प्रभुत्वाचे आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले विद्यार्थी आज विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा देत असतील, हाच त्यांचा खरा वारसा आहे, अशा शब्दात गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“आयएमए”ची प्रतिक्रिया
डॉ. संजय महाजन यांनी रुग्णसेवा करताना नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासली. आयएमएला त्यांनी विविध उपक्रमात नेहमी सहकार्य केले. डॉ. संजय महाजन हे मनमिळावू होते. त्यांच्या निधनाने कुशल फिजिशियन हरपले, अशी प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य पदाधिकारी डॉ. अनिल पाटील, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. विलास भोळे, जळगांवचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, सचिव डॉ. भरत बोरोले यांनी दिली आहे.









