सत्रासेन येथे ४५ हजार रुपयांची पाकिटे जप्त
चोपडा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगतच्या गावांमध्ये बनावट कापूस बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती जिल्हा गुण नियंत्रण भरारी पथकाला मिळाली होती. पथकाने सत्रासेन येथे कारवाई करत ४५ हजार रुपये किमतीची १० पाकिटे जप्त केली आहे.
निर्मल सिड्स प्रा. लि. पाचोरा यांनी याबाबत तक्रार केली होती. कंपनीच्या कापूस बियाण्यांची बनावट पाकिटे विक्री होत असल्याची तक्रार होती. त्यानुसार कंपनी व्यवस्थापकांच्या उपस्थितीत कृषी विभागाच्या भरारी पथकाने दि. ७ रोजी सत्रासेन ता. चोपडा येथे बनावट ग्राहक तयार करून बलवाडी ता. वरला जि. बडवानी, मध्य प्रदेश येथील कोठारी कृषी केंद्राकडे देशी संकरीत कापूस बियाणे वाणाची मागणी केली. कंपनीचे व्यवस्थापक रवींद्र चोरपगार यांनी हे बियाणे बनावट असल्याची खात्री केली. हे बियाणे दोन वर्षांपासून कंपनी उत्पादित किंवा विक्री करत नसल्याचे चोरपगार यांनी सांगितले.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या फिर्यादीवरून संजय कोठारी (बलवाडी ता. वरला जि. बडवानी, मध्य प्रदेश) इसाक खरते (वय २७, रा. खुटवाडी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) यांच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जितेंद्र पानपाटील, मोहीम अधिकारी विजय पवार, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, किरण पाटील, निर्मलचे रवींद्र चोरपगार यांनी केली आहे.