चोपडा येथील प्रकार : खात्यांतर्गत चौकशी सुरु, लवकरच अहवाल वरिष्ठांकडे

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारातील काही दुचाकींची थेट भंगार बाजारात विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. हि विक्री कुठल्याही सरकारी नियमानुसार केली नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक कृषिकेष रावले यांनी “केसरीराज”ला दिली आहे. यामुळे पोलीस दलात एकच चर्चा सुरु झाली आहे.
अनेक गुन्ह्यातील तसेच अपघातग्रस्त झालेल्या दुचाकी चोपडा ग्रामीण येथील पोलिस स्थानकाच्या आवारात ठेवण्यात आल्या होत्या. या दुचाकींची परस्पर भंगार व्यापाऱ्याला पोलिस निरीक्षकांनी विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे पोलिस दलात खळबळ आहे. याबाबतची कबुली स्वत: पोलिस निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. मात्र अपघातग्रस्त वाहने परस्पर विक्रीचा पोलिस निरीक्षकांना अधिकार नसल्याची माहिती मिळाली आहे.
चोपडा शहरातील समतानगर भागातील रस्त्यालगत अपघातग्रस्त काही दुचाकी भंगार दुकानदाराकडे असल्याची व तो त्याची विल्हेवाट लावत असल्याची माहिती चोपड़ा शहर पोलिसांना मिळाली. त्याचा तपास करण्यासाठी चोपडा शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी गेले असता, त्या दुचाकी या चोपडा ग्रामीणच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्याकडून भंगार म्हणून विकत घेतल्याचे दुकानदाराने सांगितले. यावेळी चोपडा शहरच्या कर्मचाऱ्यांवर कपाळावर हात मारून घ्यायची वेळ आली. आपल्याच विभागाच्या निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी दुचाकी विकल्यामुळे कारवाईबाबत त्यांना संभ्रम झाला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती चोपडा विभागाचे डीवायएसपी कृषिकेष रावले यांनाही मिळाली असून तेच निरीक्षक कावेरी कमलाकर यांची चौकशी करीत आहे. दरम्यान कावेरी कमलाकर यांनी एकूण ८ ते १० दुचाकी सुमारे २० हजारांना विकल्या असून त्या रकमेतून त्या पोलीस स्टेशनच्या दुरुस्तीचे काम करणार असल्याचे सांगत आहेत. मात्र दुचाकी विक्रीला सरकारी प्रक्रिया असते. त्यानुसार दुचाकी विक्रीची कुठलीही सूचना, लिलाव न करता थेट परस्पर भंगार व्यापाऱ्याला दुचाकी विकण्याचा कारनामा कावेरी कमलाकर यांनी केला आहे.
दरम्यान, निरीक्षक कावेरी यांची खात्यांतर्गत चौकशी सुरु असून, त्यातून जे निष्पन्न होईल त्याबाबत वरिष्ठांना अहवाल दिला जाईल, अशी माहिती “केसरीराज” शी बोलताना डीवायएसपी कृषिकेष रावले यांनी दिली आहे.








