स्विपरला मारहाण : हॉस्पिटलचे दिड ते दोन लाखाचे नुकसान
जळगाव (प्रतिनिधी) – येथील नीलकमल कोविड क्रिटिकल सेंटरमध्ये दाखल झालेल्या ५० वर्षीय महिलेचा रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात विना किट प्रवेश करीत सात ते आठ जणांनी तोडफोड करीत एका स्विपरला मारहाणही केली. हि घटना दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास घडली. या तोडफोडीमध्ये नीलकमल कोविड क्रिटिकल केअर सेंटरचे सुमारे दिड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, कोवीड रूग्ण महिलेच्या उपचारासाठी आवश्यकता असतांना डॉक्टरांनी व्हेंटीलेटर न लावल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील ५० वर्षीय कोरोना बाधित महिलेला नीलकमल कोविड केअर सेंटर येथे उपचारार्थ दि.२९ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. या महिलेला कोविड व निमोनिया सदृश्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर नीलकमल कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु होते. गेल्या १३ दिवसापासून महिलेवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ५० हजार रुपये डिपॉझिट भरले, त्यानंतर ३० हजार जमा केले. असे एकूण ८० हजार रुपये नातेवाईकांनी जमा केले आहे. मात्र, मेडिकल व उर्वरित हॉस्पिटलचे बिल बाकी आहे.
दरम्यान, दररोज कॉन्सिलींगद्वारे उपचार करीत असतांना इनकॅमेरामध्ये नोंद होत होती. व सदर बाधित महिलेच्या उपचारा संदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांना दररोज माहिती दिली जात होती. उपचार सुरु असतांना दि. ११ रोजी रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बाधित महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मुलगा महेंद्र पाटील यांच्यासह नातेवाईकांना देण्यात आली. मात्र, डॉक्टरांनी व्हेंटिलेटर लावले नाही असा आरोप करीत डॉक्टरांना शिवीगाळ केली. संतप्त नातेवाईकांनी नीलकमल कोविड केअर सेंटरच्या आयसीयू विभागात प्रवेश करीत मशिनरीं व साहित्यांची तोड-फोड करण्यास सुरुवात केली. यावेळी सेंटरमध्ये इतर आठ बाधित रुग्ण उपचार घेत होते. या रुग्णांना लावलेले ऑक्सिजन सिलेंडरही नातेवाईकांनी काढून फेकले. डॉक्टरांना शिवीगाळ करीत एका स्वीपरला मारहाणसुद्धा करण्यात आली. जवळपास एक तास नातेवाईकांचा गोधळ सुरु होता. तसेच कोविड सेंटरच्या साहित्याची तोड-फोड सुरु होती. यात दीड ते दोन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांनी भेट देवून गोंधळ शांत केला. तसेच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सहाय्य्क पोलीस अधीक्षक कुमार चिंथा आदी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
अश्या मानसिकतेचे करायचे काय ?
नीलकमल कोविड केअर सेंटर नागरिकांच्या सेवेसाठी सुरु केले आहे. प्रत्येक रुग्णावर उपचार केल्यानंतर रुग्णांचा नातेवाइकाईची दररोज कॉन्सलिंगद्वारे माहिती दिली जाते. दुर्देवाने अशी एखादी घटना घडल्यानंतर डॉक्टरांना दोष दिला जातो. अश्या मानसिकतेचे करायचे काय ? असा प्रश्न डॉ. मनोज टोके यांनी उपस्थित केला. रुग्णांवर वेळोवेळी उपचार करूनही अशी वेळ येत असले तर, पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांना भेटून व निवेदन देऊन सदर नीलकमल कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेले आठ बाधित रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा कोविड रुग्णहलयात हलविण्यात येईल. त्यानंतर हे कोविड केअर सेंटर बंद करणार असल्याची माहिती डॉ. मनोज टोके यांनी ” केसरीराज ” शी बोलतांना दिली.