मुक्ताईनगर तालुक्यात खळबळ
जळगाव (प्रतिनिधी) : नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी अवैध गुटखा वाहतुकीचे वाहन सोडून दिल्याप्रकरणी मुक्ताईनगरचे पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अवैध गुटखा तस्करी करणारे वाहन जप्त करण्यात आले होते. या वाहनावर कुठलीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. तसेच हे वाहन पकडणारे पीएसआय राहुल बोरकर यांच्या पथकाने या प्रकरणात हलगर्जीपणा करून वाहन सोडून दिले.
या कारणावरून विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर, हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन, कॉन्स्टेबल डिगंबर कोळी, निखिल नारखेडे, नाईक सुरेश पाटील यांना निलंबित केले आहे.
याबाबत मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना विचारणा केली असता त्यांनी निलंबित केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामुळे मुक्ताईनगर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस दलामध्ये आयजी कराळे यांच्या कारवाईमुळे आता धास्ती पसरली आहे.