भुसावळ तालुक्यात कुऱ्हे पानाचे येथील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील कंडारी गावातील नागसेन कॉलनीचे रहिवासी आणि प्रसिद्ध बॉक्सिंग प्रशिक्षक स्टीफन डेव्ह (वय ५५) यांचा नीलगायच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. १७ मे रोजी पहाटे चारच्या सुमारास जामनेर रोडवरील कुऱ्हे पानाच्या गावाच्या पुढे घडली. या अपघातात त्यांचे जावई अहिरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्टीफन डेव्ह यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. स्टीफन डेव्ह हे रेल्वे सेवेत कार्यरत होते. त्यांनी कारकिर्दीत अनेक तरुण खेळाडूंना बॉक्सिंगचे प्रशिक्षण देत राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक खेळाडूंनी महाराष्ट्राची शान वाढवली आहे. स्टीफन डेव्ह आणि त्यांचे जावई अहिरे बुलेट मोटारसायकल (क्रमांक एमएच १२ एसएच १७१६) वरून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. दरम्यान, पानाच्या कुऱ्हे गावाजवळ अचानक नीलगायांचा कळप महामार्गावर आल्याने त्यांच्या मोटारसायकलची जोरदार धडक झाली. या अपघातात डेव्ह यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना स्थानिकांनी तत्काळ मदत करत त्यांना भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र स्टीफन डेव्ह यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जखमी जावयाला अधिक उपचारासाठी जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे डेव्ह यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर नशिराबाद पोलीस स्टेशनला अपघाताच्या घटनेची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.