चिंचोली-नशिराबाद-उमाळा रस्ता व पुलाच्या कामासाठी निधी मंजूर !
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारासाठी मोठी पुढची वाट मोकळी झाली आहे. धावपट्टीची लांबी वाढवण्यास अडथळा ठरणाऱ्या नशिराबाद-उमाळे १८ हा रस्ता बंद करून त्याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून प्रमुख जिल्हा मार्ग १०९ चे साखळी क्रमांक १३/०० ते १८/०० कि.मी. दरम्यान रुंदीकरण करणे, चिंचोली ते नशिराबाद उमाळा रस्त्यापर्यंतचा वहिवाट रस्ता देणे व वहिवाट रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधकामासाठी ६ कोटी ६०लाख ७० हजार रुपयांचा निधीस प्रशासकीय व विधी मान्यता देऊन सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ५ जुलै २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार एकूण १० कोटी निधीची मागणी करण्यात आली होती. शक्तीप्रदत्त समितीने १४ जानेवारी २०२५ रोजी प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने हा निधी मंजूर केला आहे. धावपट्टी विस्ताराच्या कामांमुळे जळगाव जिल्ह्यातील विमानसेवा अधिक सक्षम होणार असून, औद्योगिक विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. पुढील काही महिन्यांत या कामांची गती वाढवली जाणार असून, जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या जळगाव विमानतळावरून हैदराबाद, गोवा, पुणे या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. या विस्तारीकरणामुळे विमानसेवा अधिक सक्षम होणार असून शेतीमालाच्या कार्गो वाहतुकीस गती मिळणार असल्याने व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. नशिराबाद व चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आभार मानले आहेत. हा निर्णय केवळ विमानतळाच्या विस्तारासाठी नव्हे, तर स्थानिक शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या सोयींसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. आता मंजूर निधीच्या अनुषंगाने विस्तारीकरणाची कामे वेगाने सुरू करण्यात येणार असून, जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.