जळगाव येथे दुपारी १२ वाजता अंत्ययात्रा
जळगाव (प्रतिनिधी) – निवृत्त प्राध्यापक, ज्येष्ठ समाजवादी आणि गांधीवादी विचारवंत प्रा. शेखर मारुती सोनाळकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी विविध आजारांशी लढताना खाजगी रुग्णालयात शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
प्रा. शेखर सोनाळकर यांनी १९७५ ते ७७ च्या आणीबाणीच्या काळातही सहभाग घेतला होता. तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध आंदोलने, उपोषणे यामध्ये सहभाग घेऊन न्याय हक्कांसाठी लढा दिला होता. वैचारिक आणि पुरोगामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विविध आजारांशी झुंजत असताना अखेर शुक्रवारी मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणजोत मालवली. यामुळे सोनाळकर कुटुंबीयांसह पुरोगामी व परिवर्तनवादी चळवळ मोठा आघात झाला आहे.
त्यांना अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी सकाळी ९ ते १२ या वेळेत आरटीओ कार्यालयामागील डाव्या बाजूच्या पहिल्या गल्लीत ओम अपार्टमेंट येथे ठेवले जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजेला नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात पत्नी वासंती दिघे, मुलगा कबीर असा परिवार आहे.