जळगाव (प्रतिनिधी) : येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक आणि गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे डॉ. प्रताप डी. जाधव यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी कर्करोगाच्या दीर्घ आजाराने शुक्रवारी ७ जुलै रोजी रात्री साडे ११ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रताप जाधव यांनी जळगाव शहरात गेल्या ३० वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य अशी सेवा दिली आहे. गरिबांचे डॉक्टर म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या भास्कर मार्केट समोरील “मालती एक्सीडेंट हॉस्पिटल” येथे अपघातात जखमी असलेली लोक त्यांच्याकडे विव्हळत यायचे. मात्र त्यांच्यासमोर आल्यावर ते रुग्णाशी हसतखेळत उपचार करायचे. त्यामुळे त्यांचे खान्देशात मोठे नाव होते.
गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाच्या आजाराशी झुंजत होते. अखेर शुक्रवारी ७ जुलै रोजी रात्री त्यांची खाजगी रुग्णालयात प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.