पारोळा तालुक्यातील नगाव येथे घटना
पारोळा (प्रतिनिधी):- तालुक्यातील नगाव येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेताजवळील गोदामाच्या जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार, २१ मार्च रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


सचिन भाऊसाहेब पाटील (वय ४०, रा. नगाव, ता. पारोळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवार, २१ मार्च रोजी सकाळी ९:१५ ते ९:३० वाजेच्या सुमारास त्यांनी नगाव शिवारातील देवीदास दौलत पाटील यांच्या मालकीच्या गोदामाच्या जिन्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
या घटनेची माहिती ज्ञानेश्वर अनिल पाटील हे गावातील कृषी केंद्रावर असताना रवींद्र संजय पाटील यांनी त्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सचिन पाटील यांना खाली उतरवले आणि तातडीने खासगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार हितेश चिंचोरे या प्रकरणाचा पुढील प्राथमिक तपास करत आहेत. सचिन पाटील यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.









