अहमदाबाद (वृत्तसंस्था)- पत्नी दारू नशेत तर्राट होऊन मला मारहाण करते अशी तक्रार करत एका तरुणाने पोलिसांकडे सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे हा प्रकार घडला असून पतीची तक्रार ऐकूण पोलिसही आश्चर्यचकीत झाले आहेत.
रवी (नाव बदलले आहे) याचा स्नेहा सोबत (नाव बदलले आहे) 2018 साली प्रेमविवाह झाला होता. अफेयर सुरू असताना रवीला स्नेहाच्या दारुच्या व्यसनाविषयी माहित नव्हते. मात्र लग्नानंतर स्नेहा दारू पिऊन घरात तमाशे करू लागली. रवीने तिचे दारूचे व्यसन सोडविण्याचे प्रयत्न केले मात्र ती त्याला साथ देत नव्हती. स्नेहा दारू पिऊन आई वडिलांना देखील त्रास देत असल्याने रवी तिच्यासोबत वेगळा राहू लागला होता. मात्र तरिही स्नेहाची सवय सुटली नाही
मे महिन्यात रवीच्या आई वडिलांना कोरोनाची लागण झाल्याने तो पुन्हा त्यांच्याकडे येऊन राहू लागला. त्यानंतर स्नेहाही त्याच्यापाठोपाठ तिथे आली व घराच्या वरच्या माळ्यावर राहू लागली. त्यानंतर पुन्हा तिने दारू पिऊन रवी व त्याच्या पालकांना त्रास द्यायला सुरुवात केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी स्नेहाने रवीविरोधात घरघुती हिंसाचाराची तक्रार केली होती. त्यामुळे स्नेहा आपल्याला कोणत्याही खोट्या प्रकरणात अडकवू शकते म्हणून रवीने खोकरा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करत सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे.