सूरत (गुजरात) :- गुजरातमधील सूरतच्या (Surat) तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ONGC) संयंत्रात गुरुवारी पहाटे अचानक भीषण आग (Fire) लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने (Fire Brigade) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हापासून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्लांटमध्ये अनेक स्फोट झाले आणि त्यानंतर भीषण आग लागली. दरम्यान, स्फोट नेमका कशामुळे झाला याचा आता तपास केला जात आहे. या कंपनीला लागलेली आग आणि त्यामुळे निघाणारे धुराचे लोट हे कित्येक किलोमीटर अंतरावरुन दिसत आहेत.
सूरतचे जिल्हाधिकारी डॉ. धवल पटेल म्हणाले की, ‘ओएनजीसीच्या हजीरा प्लांटमध्ये पहाटे तीनच्या सुमारास एकामागून एक तीन स्फोट झाले. या स्फोटांमुळे यां संपूर्ण प्लांटला आग लागली. अद्यापही घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. याठिकाणी सूरतचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारीही देखील उपस्थित आहेत. आग अधिक भडकू यासाठी प्रशासनाकडून योग्य ते उपाय केले जात आहेत.