१०८ रुग्णवाहिकेचा भोंगळ कारभार
जळगाव (प्रतिनिधी) – येथील एका नवजात बालकाला उपचारासाठी औरंगाबाद येथे घेवून जाण्यासाठी तब्बल १० तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचा प्रकार सोमवारी घडला. त्यानंतर रात्री ९ वाजता नशिराबाद येथील रुग्णवाहिका बोलाविण्यात आली असून रात्री १० वाजता बालकाला औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका नवजात बालकाला औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर बालकाचे काका शेख इरफान शेख शौकत यांनी १०८ रुग्णवाहिकेला कॉल केला असता वीस मिनिटात रुग्णवाहिका येईल असे सांगण्यात आले. नातेवाईकांनी वारंवार कॉल केले मात्र, प्रत्येक वेळी दहा मिनिटात येईल वीस मिनिटात येईल असे कारण सांगण्यात आले त्यानंतर तब्बल १० तासानंतर नशिराबाद येथील रुग्णवाहिकेला बोलाविण्यात आले असून रात्री १० वाजता नशिराबाद येथील रुग्णवाहिकेवरील डॉक्टर खालीद हे त्या नवजात बालकाला घेवून औरंबादसाठी रवाना झाले.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होती परंतु त्या रुग्णवाहिकेतील डॉक्टर उमर देशमुख हे वेळेवर न आल्यामुळे नवजात बालकाला उपचारासाठी दहा तास उशिर झाल्याचे बलकाच्या नातेवाईकांनी सांगितले. तसेच डॉ. उमर हे १०८ रुग्णवाहिकेसह वडली उप आरोग्य केंद्रात नोकरी करीत असल्याची माहिती समोर आली असून सोमवारी ते वडली येथे असल्यामुळे त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दहा मिनिटात येतो, १५ मिनिटात येतो असे सांगून संपुर्ण दिवस चालढकल केल्याचा आरोपही बालकाच्या नातेवाईकांनी केला आहे.
डॉ. उमर हे १०८ रुग्णवाहिकेवर काम करीत असतांना वडली आरोग्य केंद्रात नोकरी करीत असल्याचे १०८ त्यांच्या वरीष्ठांना देखील माहित असून ते डोळेझाक करीत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेचे जिल्हा व्यवस्थाक राहूल जैन यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.