शहर पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादितच्या बरखास्त संचालक मंडळाने दूध संघामध्ये येऊन अनधिकृतपणे प्रवेश करून बैठक घेतली. याबद्दल प्रशासक अरविंद देशमुख यांनी हरकत घेतली असून शहर पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रार अर्जात म्हटले आहे की,राज्य शासनाने जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित येथे प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली आहे. नियुक्ती झाल्यानंतर प्रशासक मंडळाने कायदेशीर पदभार स्वीकारून कामकाज सुरू केले आहे. मात्र याआधीचे संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे.
असे असताना मंगळवार दि.२ ऑगस्ट रोजी बरखास्त मंडळाने बेकायदेशीररित्या दूध संघात प्रवेश करून मीटिंग हॉलमध्ये बैठक घेतलेली आहे. तसेच प्रशासकीय मंडळाने पदभार स्वीकारल्यानंतर बरखास्त संचालक मंडळाने संघाच्या आवारात येणे व बैठक घेणे बेकायदेशीर असून त्यांनी फौजदारी स्वरूपाचा ट्रेसपासचा गुन्हा केला आहे. यापुढेही त्यांनी बेकायदेशीररित्या प्रवेश केला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याकरिता सदर बरखास्त संचालक मंडळावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी तक्रार अर्जात प्रशासक अरविंद देशमुख यांनी केली आहे.
तक्रार अर्जात, बरखास्त मंडळातील मंदाताई खडसे, प्रमोद पांडुरंग पाटील, अशोक प्रल्हाद पाटील, जगदीश बढे, हेमराज चौधरी, मधुकर राजे, सुनीताताई पाटील, शामलताई झांबरे, वसंतराव मोरे, डॉ. संजीव पाटील, श्रावण सदा ब्रम्हे यांचे नाव आहेत.