आधी दिशाभूल ; मात्र, पोलिसांपुढे एका झटक्यात खुनाची कबुली
जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवाजीनगरातील महिलेची हत्या तिच्याच भाच्याने १ लाखाच्या दागिन्यांच्या हव्यासातून केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे
माया दिलीप फरसे ( वय 51 , रा. क्रांतीचौक शिवाजी नगर ) या 15 तारखेपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांनी शोधाशोध करुनही त्यांचा तपास लागला नाही. त्यामुळे शहर पोलिसात तक्रार देण्यात आली होती. मात्र त्यांचा मृतदेह विदगाव पुलाजवळ तापी नदी पात्रात मिळून आला.
माया फरसे यांचे पती दिलीप फरसे यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की , क्रांती चौक भागातच त्यांचा भाचा अमोल दांडगे त्याच्या कुटुंबियांसह राहतो . वर्षभरापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले आहे . फरसे यांच्या घरी अमोल व त्याचा मित्र संतोष मुळीक याचे येणे जाणे होते . १५ डिसेंबर रोजी मी सकाळी साडे नऊ वाजता कामावर गेलो आणि रात्री साडे आठ वाजता घरी आलो तेंव्हा घराला कुलूप पाहून मी शेजारी चौकशी केल्यावर शेजाऱ्यांनी माझी पत्नी भाचा अमोलसोबत दुपारी २ वाजता गेली आहे असे सांगितले .
मी शहरातील काही नातेवाईकांकडे चौकशी केल्यावर माझी पत्नी त्यांच्यापैकी कुणाच्याच घरी गेली नसल्याचे समजले . अमोलला विचारल्यावर मी मामीला शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ सोडून बाजारात निघून गेलो होतो असे त्याने सांगितले होते . त्यांनतर मी घराचे कुलूप तोडून घरात तपासणी केली तेंव्हा घरातील दागिन्यांची पेटी गायब झालेली दिसली या पेटीत १ लाख रुपयांचे दागिने होते . या सगळ्या गोष्टींची माहिती मी माझ्या मुंबईला गेलेल्या मुलाला दिली त्याने मी सकाळीच परत येतो असे सांगितल्यावर तो आला . माझा मुलगा विजय मुंबईहून परत आल्यावर त्याने या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते . १६ डिसेंबर रोजी मी शहर पोलीस ठाण्यात मुलगी निकितासोबत जाऊन माझी पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती . तोपर्यंत अमोल बाहेरगावी निघून गेला होता . तो परत आल्यावर चौकशी केल्यावरही त्याने आधी सांगितलेली माहिती दिली होती . त्याची चौकशी पोलिसांनी केल्यावर पोलीस त्याला विदगाव शिवारात घेऊन गेले पोलिसांनी जावई विनोद चौधरी आणि मुलगा विजयला बोलावून घेतले होते त्यांनतर मला पोलीस ठाण्यात गेल्यावर माझ्या पत्नीचे प्रेत तापी नदीजवळ जंगलात जळालेल्या अवस्थेत सापडले असल्याचे समजले . माझ्या पत्नीची हत्या भाचा अमोलनेच या दागिन्यांच्या हव्यासातून केली आहे . अमोल दांडगेच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात भा द वि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .