दुबई (वृत्तसंस्था) – दुबईच्या मैदानावर रंगलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ गड्यांनी धूळ चारत विश्वविजेतेपद मिळवले आहे. टी-२० प्रकारात प्रथमच ऑस्ट्रेलिया संघ विश्वविजेता ठरला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केन विल्यमसनच्या वादळी ८५ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ४ बाद १७२ धावा केल्या. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या न्यूझीलंडला विल्यमसनचा आधार मिळाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने कोणताही दबाव न घेता दमदार फलंदाजी केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श दमदार अर्धशतके ठोकली. १९ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाचे स्वप्न पूर्ण केले. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला, तर न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला.
दोन्ही संघांचे उपांत्य फेरीचे सामने अतिशय रोमांचक ठरले होते. मिचेल मार्शला सामनावीर, तर डेव्हिड वॉर्नरला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मार्शने ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७७ धावा केल्या, तर मॅक्सवेल २८ धावांवर नाबाद राहिला