भोपाळ ( वृत्तसंस्था ) – शेजाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी सासू आणि जावयाने मिळून त्यांना सामुहिक बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट आखला. मात्र डीएनए चाचणीत बलात्कार शेजाऱ्यांनी केला नसून सासूने जावयाबरोबर शरीरसंबंध ठेवल्याचे उघड झाले.
खोट्या तक्रारीमुळे सासू आणि जावयालाही दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांनी २०१४ साली खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी त्यावेळी चार लोकांना अटक केली होती. नियमाप्रमाणे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी बलात्कार झाला असण्याची शक्यता आहे, असे वैद्यकीय अहवालांत म्हटले होते.
फिर्यादी महिला आणि तिच्या जावयाचे कपडे व स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, स्वॅबच्या नमुन्यातील डीएनए हे एकाही आरोपीच्या डीएनएशी जुळले नाहीत. पोलिसांनी या महिलेच्या जावयाची चौकशी केली. त्याच्या डीएनएचे नमुने मात्र जुळल्याने पोलिसांनी सखोल तपास केला.
आपले सासूबरोबर शारीरिक संबंध असल्याची कबुली जावयाने दिली.पाण्याचा नवीन हातपंप बसविण्यावरून झालेल्या वादामुळे शेजारी राहणाऱ्या चार लोकांना अद्दल घडविण्याचे सासू व जावयाने ठरविले. त्या चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची खोटी तक्रार या सासूने पोलिसांकडे केली.
हे उजेडात आल्यानंतर या दोघांना अटक केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. बलात्काराची खोटी तक्रार करण्याची प्रकरणे कमी असली तरी अशा घटनांतील आरोपींना कडक शिक्षा दिल्यास इतरांनाही जरब बसेल, असे सत्र न्यायालयाने म्हटले आहे.