क्विटो ( वृत्तसंस्था ) – इक्वाडोरच्या सर्वात मोठ्या तुरुंगातील लिटोरल पेनिटेंशरीमध्ये काल दोन प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ६८ कैदी ठार व २५ जण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर बराच वेळ परिस्थिती अनियंत्रित झाली होती. तुरुंगात ड्रग माफियांच्या टोळीशी संबंधित प्रतिस्पर्धी गटांमध्ये हे भांडण झाले, असे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले. समुद्रकिनारी असलेल्या ग्वायाकिल शहरातील तुरुंगात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तुरुंगात काही मृतदेह जळलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसत आहेत.
गुआस प्रांताचे गव्हर्नर पाब्लो अरोसेमेना यांनी सांगितले की, “ही चकमक आठ तास चालली. दुसऱ्या पॅव्हेलियनमध्ये जाण्यासाठी कैद्यांनी डायनामाइटने भिंत उडवून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांचे प्रवक्ते कार्लोस डिजॉन म्हणाले, “आम्हाला लिटोरल पेनिटेन्शियरीमध्ये झालेल्या चकमकीची माहिती मिळाली आहे. जेलच्या १२ नंबरच्या हॉलमधील कैद्यांनी ७ नंबरच्या हॉलमधील लोकांवर हल्ला केला. जवळपास ७०० पोलीस अधिकारी सुरक्षा दलांच्या तुकड्यासह तुरुंगातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.” दोन महिन्यापूर्वी लिटोरल जेलमध्ये दोन टोळ्यांमध्ये रक्तरंजित चकमक झाली होती. यात ११९ जण मारले गेले होते. सध्या या कारागृहात ८००० हून अधिक कैदी आहेत.