इस्लामाबाद ( वृत्तसंस्था ) – काश्मीरबाबतचा अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याचा मुद्दा शहबाझ शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात उपस्थित केला.
काश्मीर खोऱ्यातील लोक रक्ताळलेले असून, पाकिस्तान त्यांना ‘राजनैतिक व नैतिक पािठबा’ देईल, तसेच हा मुद्दा प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करेल, असे ते म्हणाले.
आपल्याला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, मात्र काश्मीर मुद्दा सुटल्याशिवाय हे साध्य होऊ शकत नाही, असे राजकीय उलथापालथीनंतर इम्रान खान यांना हटवून पंतप्रधानपदी आलेले ७० वर्षांचे शहबाझ यांनी सांगितले.
आपले शेजारी आपल्याला निवडता येत नाहीत, आपल्याला त्यांच्यासोबत राहावेच लागते आणि पाकिस्तानच्या निर्मितीपासून आमचे भारतासोबते संबंध दुर्दैवाने कधीही चांगले राहिलेले नाहीत, असे शहबाझ म्हणाले.
ऑगस्ट २०१९ मध्ये भारताने अनुच्छेद ३७० रद्द केला तेव्हा इम्रान खान यांनी ‘गंभीर व राजनैतिक प्रयत्न केले नाहीत’, असा आरोप शहबाझ यांनी केला.
‘काश्मिरी लोकांचे रक्त काश्मीरच्या रस्त्यांवर वाहात असून, त्यांच्या रक्ताने काश्मीर खोरे लाल झाले आहे’, असे देशाचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ यांचे लहान भाऊ असलेले शहबाझ म्हणाले.
आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, मात्र काश्मीरचा वाद सुटल्याशिवाय कायमस्वरूपी शांतता शक्य नाही, असे प्रतिपादन शहबाझ यांनी केले. काश्मीर मुद्दय़ाची सोडवणूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे यावे, जेणेकरून दोन्ही देश सीमेच्या दोन्ही बाजूंला असलेल्या गरिबी, बेरोजगारी, औषधटंचाई व इतर मुद्दय़ावर लक्ष केंद्रित करू शकतील, असेही मत त्यांनी नोंदवले.