जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागु करून खंड 2 ते 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरीकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान (Grocery) दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय (Chemist Shop) वगळून 31 मार्च, 2020 पर्यंत साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार बंद ठेवण्याचे आदेश असून त्याचबरोबर जिल्हयात सुरु असलेले सर्व खाजगी क्लासेस, टयुशन्स, अभ्यासिका पुढील आदेश होईपर्यत दिनांक 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.या आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेकडून उल्लंघन/अवज्ञा केल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येऊन पुढील कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.