जळगाव (प्रतिनिधी)-स्वस्त धान्य संदर्भातील सामान्यांचे प्रश्न सोडवल्याने तसेच तहसील कार्यालयांच्या वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्यामुळे तहसीलदार वैशाली हिंगे यांनी फोनवर खोटा गुन्हा दाखल करण्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पोलिसांकडे केली आहे.
त्यांनी या संदर्भात वरिष्ठ पातळीपर्यंत मेल पाठविला असून त्यात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन सुरू असतांना अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत हे लोक स्वस्तधान्य आणि जिवनावश्यक वस्तुंसाठी तहसील कार्यालयात जावून कायदेशिररित्या मागणी करीत आहेत. त्यांची समस्या सोडविण्यासाठी अनेकांनी मला विनंती केली होती. त्या पार्श्वभुमीवर मी पाठपुरावा करून तहसील कार्यालयातील तक्रारींची महसुल विभागाकडे माहिती दिली. यावरून तहसीलदार हिंगे यांना आपण काम करीत नसल्याचे गुप्ता हे वरिष्ठांना सांगत असल्याचे वाटले. यावरून त्यांनी 15 एप्रिल रोजी दुपारी 12.46 मिनीटांनी वॉटसअपवर कॉल करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे. त्यांनी कॉल डिटेल्सची प्रत पोलिसांकडे दिली असून स्वत: उपस्थित राहूनही पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मी धमकी दिली नाही : तहसीलदार हिंगे
गुप्ता हे बुधवारी तहसीलच्या आवारात फिरून व्हिडीओ शुटींग करीत होते. या संदर्भात कर्मचार्यांनी मला माहिती दिली. मि फोन करून केवळ त्यांना विचारणा केली की, कुठे आहात म्हणून या व्यतीरिक्त अन्य कसलाही संवाद झाला नाही. गुप्तांवर गुन्हा मी नव्हे नायब तहसीलदारांनी दाखल केला आहे. गुप्ता यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आहे.सदरहून या नंबरवरून मला मेसेज आले होते. याबाबत मी चेक करण्यासाठी मी त्यांना फोन केला. – तहसीलदार वैशाली हिंगे