जळगाव ( प्रतिनिधी ) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील उपक्रमांचा भाग म्हणून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाने जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने यावल येथे 12 नोव्हेंबर ( शुक्रवार ) रोजी तहसील कार्यालय जवळ एक दिवसीय कायदेविषयक महाशिबिराचे आयोजन केले आहे.
या कायदेविषयक महाशिबिराच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी शासनाच्या विविध विभागातील योजना सुलभ पद्धतीने अवगत करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
शेती आणि शेतीपूरक व्यवसाय तसेच दुभत्या जनावर विषयक समस्या आणि प्रश्नाचं निराकरण जिल्हा परिषद जळगावचा कृषी आणि पशुसंवर्धन विभाग करणार आहे. आरोग्य विषयक समस्या आणि प्रश्नाचं निराकरण आरोग्य विभाग करणार आहे. शिष्यवृत्ती व शालेय समस्या आणि प्रश्नाचं निराकरण समाज कल्याण आणि शैक्षणिक विभाग करणार आहे.
परितक्त्या, विधवा स्त्रिया, दिव्यांग यांच्या करीता विविध योजना, शेतकऱ्यांना शेततळी, लघु उद्योगासाठी शासनाचे अनुदान, महसुली कामासाठी तलाठी आणि तहसील कार्यालयाकडून विविध कामासाठी अपेक्षित वेळ, नागरिकांची सनद (citizen charter) जन्म मृत्यू नोंदणी, मतदार नोंदणी, बँक कर्ज योजना, आर. टी. ओ. कार्यालयातर्फे लायसन्स साठी अत्यावश्यक दस्तावेज आणि प्रक्रिया , अशा बाबीवर मार्गदर्शन लाभणार आहे. याचवेळी लोकांना कोविड प्रतिबंधक डोस देण्याबाबत देखील नियोजन करण्यात आलेले आहे. या एकदिवसीय महाशिबिराचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.