पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : परतीच्या पावसाने उसंत न घेता रविवारी रात्रीसुध्दा पाचोरा आणि भडगाव तालुक्याला पुन्हा एकदा झोडपून काढले. त्यामुळे नगरदेवळा परिसरातील तितूर, अग्नावती, गडद, अरुणावती या नद्यांना पूर आला. सोमवारी पहाटे नगरदेवळा येथील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले. त्यात बुडून निवृत्त सैनिकासह दोन जणांचा मृत्यू झाला.
सीमा सुरक्षा दलातील निवृत्त जवान रवींद्र प्रभाकर पाटील (४०) आणि राजेंद्र गोरख पाटील (३८, दोघे रा. नगरदेवळा, ता.पाचोरा) अशी मृतांची नावे आहेत. अग्नावती नदीला पूर आला असताना बाजारातील साहित्य आवरतांना पुराचा लोंढा आल्याने हे दोघे वाहून गेले. दुपारी बाजारपेठेतील दुकानदार आपल्या दुकानाकडे आले असता, त्यांना नदीकाठावरील झुडूपांमध्ये या दोन जणांचे मृतदेह आढळून आले.
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दोघांचे मृतदेह देण्यात आले यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. नगरदेवळा दुरुक्षेत्र पोलिसांनी पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली.